पुणे : शिक्षकांवर फेब्रुवारी महिन्यात मतदानासाठी काम, मतदारचिठ्ठ्यांचे वाटप, दहावीच्या परिक्षांचे नियोजन अशी जबाबदारी आली असून केंद्राध्यक्षांचे काम करणाऱ्यांवर बूथ लेव्हल आॅफिसरच्या (बीएलओ) कामाचा, घरोघर मतदान चिठ्ठ्या वाटण्याचा दुहेरी-तिहेरी ताण आहे. काही जणांनी मतदारचिठ्ठ्या वाटण्याचे काम स्वीकारलेले नाही. त्यामुळे शासकीय मतदारचिठ्ठ्यांचे वाटप पूर्ण होईल की नाही, अशी चिंता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी पोलिसांसह ६५ हजार कर्मचारी नियुक्त आहेत. पुणे शहरात त्यापैकी २० हजार जणांचा समावेश आहे. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करणाऱ्यांनाच आज बीएलओ म्हणून नियुक्त केल्याचे मेसेज करण्यात आले. वाटपासाठी मतदारचिठ्ठ्या घेऊन जाव्यात, असे आवाहनही त्यामध्ये होते. केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी निश्चित झाल्यानंतर बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे दोनवेळा प्रशिक्षण झाले आहे. त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक कार्यालयात हजेरीपटावर त्यांची नोंदही झाली आहे. अशा स्थितीमध्ये मतदानचिठ्ठ्याही वाटण्याचे दमछाक करणारे काम पदरात पडल्याने विशेषत: शिक्षकवर्ग हैराण झाला आहे.पुणे शहरात गुरुवारपासून इयत्ता दहावीच्या कलचाचणी परिक्षेचे काम सुरू झाले आहे. रविवारी शिष्यवृत्ती परिक्षा आहे. २१ तारखेच्या मतदानासाठी शिक्षकांना आदल्यादिवशी सकाळी साडेआठपासूनच कामावर यावे लागणार आहे. मतदान संपल्यानंतर बारावी आणि दहावीच्या परिक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून काम करण्याची जबाबदारी आहे. त्यातही जे दहावीचे शिक्षक आहेत, त्यांना ताण आला आहे. शालेय जबाबदारी आणि मतदान कर्मचारी म्हणून जबाबदारीचा ताण असताना आता मतदानचिठ्ठ्या वाटण्याचे दमछाक करणारे काम शिक्षकांच्या खांद्यावर आले आहे. विविध भागातील उंच, मोठ्या इमारती असलेल्या सोसायट्या, चाळी, वाडे, झोपडपट्ट्या अशा भागांत हजारो मतदारचिठ्ठ्या वाटण्याचे शिवधनुष्य पेलण्याची चिंता शिक्षक वर्गात असून त्यामुळे फेब्रुवारी महिना तणावाचा असल्याची प्रतिक्रिया त्यांच्यात आहे. (प्रतिनिधी)
मतदारचिठ्ठ्या वाटपाचा ताण
By admin | Updated: February 17, 2017 05:21 IST