लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघासाठी मंगळवार (दि. १) रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होत आहे. विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ हजार २०२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही अधिक बळकट करा असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
------
या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत
पदवीधर, शिक्षक मतदार संघात दुरंगी- तिरंगी लढती
पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, माजी आमदार शरद पाटील, डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्यात प्रमुख लढत आहे.
शिक्षक मतदारसंघात पुणे विभागात ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार प्रा. जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात प्रमुख लढत आहे. दोन्ही मतदारसंघात तिरंगी-दुरंगी लढती होणार आहेत.
___
एकूण मतदार व मतदान केंद्र
पदवीधर मतदार संघ
जिल्हा मतदार मतदान केंद्र
पुणे १ लाख ३६ हजार ६११ २३२
सातारा ५९ हजार ७१ १३२
सांगली ८७ हजार २३५ १४३
सोलापूर ५३ हजार ८१३ २०५
कोल्हापूर ८९ हजार ५२९ १२३
एकूण ४ लाख २६ हजार २५७ ८३५
---------
शिक्षक मतदार संघ
जिल्हा मतदार मतदान केंद्र
पुणे ३२ हजार २०१ १२५
सातारा ७ हजार ७११ ४४
सांगली ६ हजार ८१२ ४८
सोलापूर १३ हजार ५८१ ७६
कोल्हापूर १२ हजार २३७ ७४
एकूण ७२ हजार ५४५ ३६७
------
जम्बो मतपत्रिका उत्सुकतेचा विषय
पुणे विभाग पदवीधर मतदार संघात तब्बल ६२ तर ‘शिक्षक’मध्ये ३५ उमेदवार आहेत. यामुळे प्रथमच ‘जम्बो’ मतपत्रिका झाली आहे. पदवीधर मतदार संघाची मतपत्रिकेचा आकार ६१ गुणिले ७७ सेंटीमीटर इतका आहे. शिक्षक मतदार संघाची मतपत्रिकेचा आकार ४६ गुणिले ६१ सेंटीमीटर आहे. यामुळे मतपत्रिकेत पसंतीचा उमेदवार शोधणे, मतदान करून मतपत्रिकेची घडी घालणे डोकेदुखी ठरणार आहे.
---------
शेवटचा एक तास कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांचे सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदान अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, हातमोजे आदींचा समावेश असलेले किट देण्यात आले आहे. मास्क, थर्मल गन, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझर, लिक्विड सोप यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. शेवटचा एक तास कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मतदानासाठी राखीव असेल.
- डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी