पुणे : आगामी विधानसभेत मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजाविण्याची संधी असताना, युवा वर्गाने मतदार नोंदणी करण्यात उदासीनता दाखविली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ३ लाख २ हजार युवक-युवतींपैकी ६० टक्के युवकांनी मतदार नोंदणीच केली नसल्याचे समोर आले आहे. मतदार नोंदणीचा टक्का वाढविण्याचे; तसेच विशेषत: १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची व महिलांची मतदार नोंदणीचे प्रमाण वाढविण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यासाठी १ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींनी नोंदणी केल्यास, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. युवा मतदारांचा टक्का खूप कमी असल्याने, त्यांचा टक्का वाढविण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार मतदार नोंदणी अभियान व विशेष पुनर्निरीक्षण मोहिमे अंतर्गत युवकांसाठी खास मोहीम राबविण्यात आली होती. महाविद्यालय स्तरावर त्याचा प्रसार व प्रचार करण्यात आला होता. या माध्यमातून युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मतदार नोंदणीत आॅगस्टअखेर १ लाख १६ हजार ६९६ पर्यंत वाढ झाली होती. तसेच, सप्टेंबर महिन्यात १७ तारखेपर्यंत मतदार नोंदणी करण्याची मुदत होती. त्यामुळे युवक लोकसंख्येच्या तुलनेत मतदार नोंदणीचा टक्का ४० वर पोचला आहे. मात्र, अजूनही ६० टक्के मतदार नोंदणीच्या कक्षेबाहेरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क बजाविता येणार नाही. युवा मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्याचे, त्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. सर्वत्र नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे पक्ष आश्वासने देत असताना दिसत आहेत. मात्र, युवा वर्गामध्ये मतदानाविषयीच उदासीनता आढळून येत आहे. (प्रतिनिधी)
मतदार नोंदणीला तरुणाईचा ठेंगा
By admin | Updated: September 24, 2014 05:57 IST