लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विश्वेश्वरय्या हे एक अष्टपैलू नेतृत्व होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे विभागाच्या कालवा, ब्लॉक सिस्टीम, डेव्हलप करून धरणाचे पाणी शेतापर्यंत नेण्यासाठी प्रचंड कार्य केले. कृष्णा सागरसारखे मोठे धरण बांधून हजारो एकर शेती पाण्याखाली आणली. अनेक धरणांची उंची वाढवून पाण्याचा साठा वाढवला. धरणांना पुराचा धोका होऊ नये म्हणून ऑटोमॅटिक गेट्स बसून ब्रिटिशकालीन धरणांना पुनर्जीवित केले. यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये विश्वेश्वरय्या यांचा मोलाचा वाटा आहे. या महान अभियंत्याच्या जयंतीच्या निमित्ताने मला खूप मोठी काम करताना प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार पुणे प्रादेशिकचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांच्या वतीने मुख्य अभियंता इंजि. साळुंके व पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गचे समन्वयक इंजि. दिलीप मेदगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना अभिवादन करण्यात आले. पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता इंजि. अतुल चव्हाण उपस्थित होते.
डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा परिचय इंजि. दिलीप मेदगे यांनी करून दिला. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण पुण्यात झाले याचा पुणेकरांना खूप अभिमान असल्याचे ते म्हणाले. उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता बाप्पा बहिर, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता मैथिली झांजुरणे, डिझाईनचे कार्यकारी अभियंता बारभाई, क्वालिटी कंट्रोलचे कार्यकारी अभियंता डी. बी. विभूते आदी यावेळी उपस्थित होते.