लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदान प्रक्रिया निर्भय, निपक्ष व पारदर्शी वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाने पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील सर्वच १२०२ मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात त्यादृष्टिने वेबकास्टिंग कक्ष उभारण्यात आला असून, या कक्षात मतदान केंद्रावरील कामकाज पाहता येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासोबतच पाचही जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयातही वेबकास्टिंग कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षातून पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही मतदान केंद्रावरील कामकाज पाहू शकणार आहेत.
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचे संपूर्ण लाइव्ह वेबकास्टिंग, सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. १२०२ मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. राव यांनी सोमवारी या कक्षास भेट देत पाहणी करून पाचही जिल्ह्यातील मतदान केंद्रावरील तयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात उभारण्यात आलेल्या या वेबकास्टिंग कक्षाचे समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी कामकाज पाहत आहेत. तसेच विभागीय गोदाम निरीक्षक संतोष सर्डे या कक्षासाठी कार्यरत आहेत. शिक्षक मतदार संघासाठी ३६७ व पदवीधर मतदार संघासाठी ८३५ मतदान केंद्र आहेत, या सर्वच मतदान केंद्रावर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.