महालिंग सलगर- कुपवाड -सांगली, मिरजेला दोनवेळा ड्रेनेज योजना झाली. मात्र, महापालिकेत समावेश होऊन सोळा वर्षे लोटली, तरी कुपवाड शहर ड्रेनेज योजनेपासून वंचित आहे. शहरात आजही रस्त्यांवर व लगत सांडपाणी वाहते, पण याची खंत ना प्रशासनाला आहे, ना लोकसेवक म्हणून मिरविणाऱ्या नगरसेवकांना! परिणामी कुपवाडकरांना साथीच्या आजारांना नेहमीच तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी या नियोजित ड्रेनेज योजनेला पाणी योजनेचा अडसर होता. परंतु, आता पाणी योजना पूर्ण झाली आहे. प्रशासन मात्र आॅक्सिडेशन पॉन्डचे कारण पुढे करून योजना प्रस्तावित करीत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या राजकारणात सांगली, मिरजेपेक्षा कुपवाडचे प्राबल्य नेहमीच कमी असते. त्याला कारणही तसेच आहे. शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये मिरजेप्रमाणे एकी नाही. सांगलीसारखे नेतृत्वही नाही. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये शहरासाठी निधीची तरतूद केली जाते, परंतु, प्रत्यक्षात हा निधी पूर्ण क्षमतेने कधीही खर्च होत नाही. हा निधी कागदावरच राहतो. सांगली, मिरजेतील लोकप्रतिनिधींनी एकीच्या जोरावर दोनवेळा ड्रेनेज योजना मंजूर करून घेतली. तसेच योजनेची कामेही केली. या दोन्ही शहरात दोनशे कोटीच्या जवळपास निधी ड्रेनेज योजनेवर खर्च झाला आहे. मात्र, कुपवाड शहरासह उपनगरांत ड्रेनेज योजना मंजूर होऊ शकलेली नाही. महापालिकेत यापूर्वी सत्तेवर आलेल्या महाआघाडीने त्यांच्या कालावधित सांगली, मिरजेबरोबरच कुपवाड शहरासाठीही ९८ कोटींची ड्रेनेज योजना प्रस्तावित केली होती. परंतु, या योजनेला पाणी योजनेचा अडसर निर्माण झाला होता. पाणी योजना पूर्ण होऊन १३५ लिटर दरमाणसी पाणी पोहोचविण्याची अट होती, असे महापालिकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही अट आता कुपवाड शहरासाठीची पाणी योजना पूर्ण झाल्यामुळे संपली असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे आता नव्याने महापालिकेत सत्तेवर आलेल्या काँग्रेसला ही अट सतावणार नाही. तरीही त्यांनी आता ड्रेनेजच्या निचऱ्यासाठी आवश्यक असलेल्या आॅक्सिडेशन पॉन्डच्या जागेचे कारण पुढे करून शहरासाठीची ड्रेनेज योजना अजूनही प्रस्तावित केली नसल्याचे समजते. सध्या नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे पॉन्डसाठीची जागाही कमी लागणार आहे. तरीही आॅक्सिडेशन पॉन्डसाठी जागा मिळत नाही, हे अजबच कारण पुढे केले जात असल्याचा आरोप होत आहे. ही योजना शहरात होत नसल्यामुळे कुपवाडवासीय मात्र उघड्या गटारी व तुंबलेल्या गटारींमुळे साथीच्या आजारांना बळी पडत आहेत.शहरात ड्रेनेज योजना नसल्यामुळे गटारी तुंबतात. तसेच उघड्यावर पाणी सोडले जाते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांमुळे हिवताप, विषमज्वर, डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांना नागरिक बळी पडतात. गटारीमधून गेलेल्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे इतरही आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरात ड्रेनेज योजना पूर्ण होणे गरजेचे आहे.- डॉ. चैतन्य रेवाण्णा, अध्यक्ष, कुपवाड मेडिकल असोसिएशनसदस्यांचा आशावादनगरसेवक गजानन मगदूम व विष्णू माने यांनी सांगितले की, कुपवाड शहरासह उपनगरांसाठी यापूर्वी ९८ कोटींची ड्रेनेज योजना प्रस्तावित केली होती; परंतु पाणी योजनेअभावी योजना मंजूर झाली नाही. आता पाणी योजना पूर्ण झाली आहे. जवळपास दीडशे कोटींचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. आॅक्सिडेशन पॉन्डसाठीही पाच एकर जागा घेण्यात येणार आहे. आम्ही शहरातील काँग्रेससह इतर पक्षांचे सर्व नगरसेवक व राजकीय नेते मिळून शहरासाठी ही ड्रेनेज योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार आहोत. त्यामुळे नागरिकांची नाराजी निश्चितपणे दूर होईल.
ड्रेनेजअभावी कुपवाडकर पडताहेत साथीच्या आजारांचे बळी
By admin | Updated: January 8, 2015 23:18 IST