पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी भाजीपाल्याची आवक घटली. मात्र, ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने बहुतेक भाज्यांचे भाव स्थिर राहिले. दरम्यान, हिरव्या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने भाव वाढले आहेत.मार्केट यार्डात रविवारी १४० ते १५० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्यात ही आवक १६० ते १७० ट्रक एवढी होती. थंडीचा कडाका वाढल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. असे असले तरी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे भाज्यांचे भावात फारसा चढउतार झाला नाही. दिल्ली येथून गाजराची आवक सुरू झाली असून, रविवारी सुमारे ४०० गोणी आवक झाली. पुढील किमान तीन महिने या गाजराचा हंगाम सुरू राहील. गाजराला प्रति दहा किलो २५० ते ३०० रुपये भाव मिळाला.मागील आठवड्याच्या तुलनेत भेंडीच्या भावात दहा किलोमागे १०० रुपयांची घट आणि गावरान गवारच्या भावात १०० आणि हिरव्या मिरचीच्या भावात १३० रुपयांची वाढ झाली. पालेभाज्यांमध्येही कोथिंबीर, मेथीसह बहुतेक भाज्यांचे भावही स्थिर राहिले. रविवारी बाजारात कोथिंबीर व मेथीची प्रत्येकी सुमारे सव्वा लाख जुडी आवक झाली. बाजारात परराज्यातून कर्नाटक व गुजरात येथून सुमारे ३ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, इंदूर व आग्रा येथून ५० ते ६० ट्रक बटाटा आणि मध्य प्रदेशातून सुमारे ४ हजार गोणी लसणाची आवक झाली. स्थानिक भागातून १० ते १४ टेम्पो कोबी, १५ ते १८ टेम्पो फ्लॉवर, १० ते १२ टेम्पो ढोबळी मिरची, ६ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, ५ ते ६ टेम्पो गाजर, २ ते ३ टेम्पो शेवगा, ५ ते ६ टेम्पो पावटा, ८ ते १० टेम्पो तांबडा भोपळा, ३ ते ४ टेम्पो भावनगरी मिरची, सुमारे १०० गोणी भुईमूग शेंगची आवक झाली.फळभाज्यांचे दहा किलोचे भाव पुढील प्रमाणे : कांदा : ७०-१३०, बटाटा : ७०-१४०, लसूण: ९००-१४००, आले (सातारी) : १२००-१४०, भेंडी : ३००-४५०, गवार : गावरान ३००-४००, सुरती २००-३००, टोमॅटो : ५०-८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १००-२५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १६०-२००, काकडी : १८०-२२०, कारली : हिरवी १४०-१६०, पांढरी : १२०-१४०, पापडी : १००-१४०, पडवळ : १००-१२०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ५०-६०, वांगी : ६०-८०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ८०-१२०, तोंडली : कळी १००-१५०, जाड : ५०-६०, शेवगा : ४५० ते ५००, गाजर : ६०-२५०, वालवर : ६०-८०, बीट : १००- १२०, घेवडा : २५०-३००, कोहळा : ८०-१२०, आर्वी : १६०-२००, घोसावळे : ८०-१४०, ढेमसे : ३००-४००, भुईमुग शेंग : ४००-४५०, मटार : स्थानिक ८००-१०००, पावटा : ३००-४००, तांबडा भोपळा : ६०-८०, कैरी : तोतापुरी ३८०-४००, गावरान २५०-३००, रताळी ८० ते १००, सुरण : २४०-२५०, नारळ (शेकडा) : १०००-१६००, मका कणीस : ६०-१२०.पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ५००-७००, शेपू: ५००-१०००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २५०-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-५००, पालक : ५००-७००, हरभरा गड्डी ह्य५००-८००. (प्रतिनिधी)
भाजीपाल्याचे भाव स्थिर
By admin | Updated: November 14, 2016 02:23 IST