वाल्हे : येथील ग्रामप्रदक्षिणेला ८८ वर्षांची परंपरा असून, या ग्राम प्रदक्षिणेची गावकरीच नव्हे, तर सोहळ्यामध्ये देशभरातून सामील होणाऱ्या वारकऱ्यांचे भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्हे येथील ग्रामप्रदक्षिणा रद्द होणार नाही, असे पालखी सोहळा प्रमुखांनी आश्वासन दिले. या निर्णयाचे ग्रामस्थांनी फटाके फोडून स्वागत केले आहे.संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी प्रस्थान होण्याअगोदर पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू यांनी वाल्हे येथील ग्रामप्रदक्षिणा रद्द केल्याने जाहीर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभेद्वारे मंगळवारी गाव बंद करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आज सासवड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मुक्कामी आल्यानंतर समाजआरती झाल्यानंतर श्रीमंतराजे शितोळे सरकार, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैैठक झाली. बैठकीमध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, वाल्हेचे उपसरपंच पोपटनाना पवार, दत्तात्रय पवार, सूर्यकांत पवार, किरण कुमठेकर, सचिन देशपांडे, माजी सरपंच महादेव चव्हाण, पोलीस पाटील प्रवीण कुमठेकर उपस्थित होते. या वेळी हा निर्णय जाहीर केला. (वार्ताहर)आठवडे बाजार रद्द...संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामुळे मंगळवारचा वाल्हे येथील आठवडे बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आला असल्याचे उपसरपंच पोपटनाना पवार यांनी सांगितले.
वाल्हेला ग्रामप्रदक्षिणा होणार
By admin | Updated: July 13, 2015 23:59 IST