सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथील तिरूपती बालाजी मशरूम या कंपनीच्या कंपोस्ट प्रकल्पाची महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळांच्या अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी तपासणीसाठी घेऊन गेले. येथील तिरूपती बालाजी ही मशरूमची कंपनी आहे. या कंपनीमुळे गावकऱ्यांना नेहमीच त्रास होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी अचानक महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळांच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत पाण्याच्या नमुन्यांची तपासणी के ली. तीन महिन्यांपूर्वी वाघळवाडी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाचा ‘ना हरकत दाखला’ मागूनही अजून या कंपनीने ग्रामपंचायतीला अद्यापही दाखला दिला नाही. मात्र, दुसरीकडे दर तीन वर्षांनी दाखला देणे बंधनकारक असताना ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थ ज्योतिराम जाधव, हेमंत गायकवाड, ऋतुराज गायकवाड, गजानन सावंत, हरीश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
वाघळवाडीच्या कंपनीची प्रदूषण मंडळांकडून तपासणी
By admin | Updated: December 25, 2014 04:54 IST