लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकाच दिवसात अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करत जिल्ह्याने मंगळवारी (दि. ३१) राज्यात लसीकरणाचा स्वत:चाच कीर्तिमान मोडत नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. बजाज समूहाने दिलेले दीड लाख डोस आणि शासनाकडे उपलब्ध असलेल्या लसी यातून राबविण्यात आलेल्या मेगा लसीकरण कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आतापर्यंत ८१ लाख ३१ हजार ३० डोस पुण्याला मिळाले आहेत.
मंगळवारी (दि. ३१) मेगा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागातील ५५९ केंद्रांवर दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, तर पुणे आणि पिंपरी मिळून दोन लाखांपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट प्रशासनाचे होते. रात्री ९ पर्यंत वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. ग्रामीण भागात १३ तालुक्यांत १ लाख ७७ हजार ३२५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर पुणे आणि पिंपरीत ६६ हजार ३९३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात १ लाख ८९ हजार ४७२ जणांनी पहिला डोस घेतला, तर ४८ हजार ५९० नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन लसीकरणाचा आकडा कोविन पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम सुरू होते.