लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत सोमवारी ६ हजार ६१८ दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यातील ४५ वर्षांपुढील २ हजार ४०२ दिव्यांगांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात २८ हजार ७७२ नोंदणीकृत दिव्यांग व्यक्ती आहेत. यातील अनेक नागरिक हे कोरोना लसीकरणापासून वंचित होते. यामुळे जिल्हा परिषदेमार्फत सोमवारी दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ११८ केंद्रांवर या मोहिमेची व्यवस्था करण्यात आली होती. आज ६ हजार ६१८ दिव्यांगांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी २ हजार ४०२ जणांनी लसीकरण केले. यातील १ हजार ५२५ जणांनी पहिला, तर ८७७ दिव्यांगांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटांतील लसीपासून वंचित असलेल्या दिव्यांगांची यादी बनविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शासकीय आदेश येताच त्यानुसार लसीकरण मोहीम आखून त्यांचे लसीकरण पूर्ण केले जाइल असे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.