पुणे : हरियाणामध्ये झालेल्या दलित हत्याकांडाबाबत बेजाबदार वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या निषेधार्थ महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांनी या वेळी सभासदांना उद्देशून कुत्रा शब्द वापरल्याने त्यांचाही या वेळी निषेध करण्यात आला. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी हा शब्द कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले. दलित हत्याकांडविरोधात बेजबाबदार वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, अशी तहकुबी उपमहापौर आबा बागुल यांनी मांडली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी भाषण करण्यास सुरूवात केली. मात्र, भाजपाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या समोरील जागेत येऊन या तहकुबीला विरोध करण्यास सुरूवात केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या सदस्यांनी सिंह यांच्या निषेधाचे फलक सभागृहात फडकविले. भाजपाच्या नगरसेवकांनी या तहकुबीला विरोध करणे म्हणजे त्यांच्या वक्तव्याला संमती देण्यासारखे असल्याची भावना या वेळी इतर पक्षाच्या सभासदांनी व्यक्त केली. या वेळी भाजपाचे सभासद सभागृहातून बाहेर पडले. काँग्रेसच्या नगरसेविका कमल व्यवहारे, राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र माळवदकर, आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी भाजपा सरकारचा निषेध करणारी भाषणे या वेळी केली.
व्ही. के. सिंहाच्या निषेधार्थ सभागृह तहकूब
By admin | Updated: October 29, 2015 00:10 IST