पुणे : महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवर अनाधिकृतरित्या ‘रूफ टॉप’ चा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई बडगा उभारण्यात येणार आहे़ ‘लोकमत’ने याबाबत वृत्त दिले होते.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी, शहरातील कोण-काणेत्या व्यावसायिक इमारतींवर ‘रूफ टॉप’ चा वापर होत आहे, याच्या पाहणीचे आदेश दिले आहेत. बांधकाम विभागाच्या अतिक्रमण विभागाकडून ही पाहणी होणार असून, विनापरवाना सर्रासपणे ‘रूफ टॉप’ चा हॉटेल व रेस्टॉरंट अॅण्ड बार व अन्य व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे़
देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवर व्यावसायिक कारणांसाठी ‘रूफ टॉप’ चा वापर करण्यास कोणासही, पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही़ लॉकडाऊनच्या काळात व नंतरच्या काही महिन्यात इमारतींच्या टेरेसवरील अनाधिकृत बांधकामे वाढली आहेत़
व्यावसायिक इमारतीचा बांधकाम परवाना देताना इमारतीच्या टेरेसचा वापर सर्वांनाच करता येतो़ पण या टेरेसवर हॉटेल, रेस्टॉरंट अॅण्ड बार अशा व्यावसायिक वापरास परवानगी दिलेली नाही़ मात्र नव्या बांधकाम नियमावलीनुसार नियमांच्या चौकटीत व सर्व परवाने घेऊन उभारण्यात येणाऱ्या ‘रूफ टॉप’ ला परवानगी देण्याचे विचाराधीन आहे़ यात सुरक्षा विषयक सर्व खबरदारी म्हणजे अग्निरोधक यंत्रणा, आपत्तकालीन परिस्थिती टेरेसवर चढण्या उतरण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा आदींचा समावेश राहिल़ दरम्यान अद्यापपर्यंत नवीन बांधकाम नियमावलीनुसार शहरातील कोणत्याही बांधकाम व्यावसायिकांने परवानगी मागितलेली नाही किंवा अर्जही केलेला नसल्याचेही देशमुख यांनी सांगितले़
--------------------------------------