लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांना शेतीविषयक यांत्रिक अवजारे देण्याच्या योजनेत जिल्ह्याला ५ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. सोडतीमध्ये ६४७ लाभार्थींची निवड झाली असून त्यांना योजनेसाठीच्या संकेतस्थळावर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केले आहे.
शेतकऱ्यांना शेतीतील सुधारणांसाठी यांत्रिक अवजारे देण्याची योजना राज्य सरकार गेली काही वर्षे राबवत आहे. यावर्षी प्रथमच संपूर्ण राज्यासाठी या योजनेचे एक संकेतस्थळ विकसीत करण्यात आले. त्यावर सर्व इच्छुकांना मागणी नोंदवण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यात एकूण ६५ हजार ४९४ अर्ज या पोर्टलवर मिळाले. त्याची सोडत काढण्यात आली. त्यात ६४७ लाभार्थी निवडले आहेत.
या सर्व लाभार्थींना कृषी विभागाच्या वतीने त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यात आला आहे. त्यात त्यांचे आधारकार्ड, ज्या यंत्रासाठी मागणी केली त्या यंत्राच्या खरेदीचे अंदाजपत्रक वगैरे माहिती संकेतस्थळावर पाठवण्याचे करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी करून पात्र लाभार्थींना खरेदीसाठीची पूर्वसंमती दिली जाईल. ती अवजारे त्यांनी खरेदी करून त्याच्या पावत्या याच संकेतस्थळावर पाठवल्यानंतर ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.