पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी तसेच अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केलेल्या परदेश दौ-याची एकत्रित माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्यामुळे माहिती अधिकार कायद्यानुसार ही माहिती देता येणे शक्य होत नाही, असे उत्तर विद्यापीठाच्या माहिती अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारानुसार केलेल्या एका अर्जाला दिले आहे.विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ. अतुल बागुल यांनी जानेवारी २००५ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालकांनी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या संचालकांनी, अधिष्ठाता तसेच व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केलेल्या परदेश दौऱ्याची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली आहे. परंतु, बागुल यांनी मागतलेली माहिती ही अनेक अधिकाऱ्यांच्या प्रवासाबाबतची असून मागविलेली माहिती ढोबळमानाने केलेली आहे. त्याचप्रमाणे मागणीचा कालावधी खूप मोठा असल्यामुळे सदरची माहिती ही एकत्रितरीत्या उपलब्ध नसल्यामुळे पुरविता येणे शक्य होत नाही, असे उत्तर बागुल यांना कळविले आहे. (प्रतिनिधी)
विद्यापीठाकडे नाही परदेश दौ-याची माहिती
By admin | Updated: January 14, 2015 03:17 IST