लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित १९ वर्षांखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथमेश बाजारे (२-४७ व ५५ धावा) याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर संयुक्त जिल्हा संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा ४८ धावांनी पराभव करून विजतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात संयुक्त जिल्हा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आणि ४५ षटकांत ८ बाद २६४ धावा केल्या. सलामीची जोडी अनिकेत नलावडे (२८ धावा) व किरण चोरमलेने ४७ चेंडूंत ५८ धावा यांनी ६० चेंडूत ६३ धावांची सलामी दिली. त्यानंतर अभिषेक पवार (४४ धावा) केल्या. प्रथमेश बाजारे (५५ धावा) याने क्षितिज पाटील (१९ धावा)च्या साथीत सातव्या गड्यासाठी ६० चेंडूत ७२ धावांची भागीदारी करुन संघाला २६४ धावा उभारून दिल्या. केडन्सकडून कौशल तांबे (२-३५), प्रद्युम्न चव्हाण (२-४३), अर्शिन कुलकर्णी (१-३९), राझीक फल्लाह (१-४४) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात केडन्स क्रिकेट अकादमी संघ ३९ षटकांत २१६ धावांवर बाद झाला. यामध्ये सलामीचे फलंदाज अर्शिन कुलकर्णीने ३७ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावा व अथर्व धर्माधिकारीने ६२ चेंडूत ५ चौकारांसह ४५ धावा करत ७९ चेंडूत ९० धावांची जोरदार सलामी दिली. मात्र अर्शिन व अथर्व धर्माधिकारी हे बाद झाल्यानंतर मधली फळी कोसळली. संयुक्त जिल्हा संघाकडून क्षितिज पाटील (२-४२), प्रथमेश बाजारे(२-४७), किरण चोरमले (२-३३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर प्रथमेश बाजारे ठरला.
विजेत्या संयुक्त जिल्हा संघाला करंडक प्रदान करण्यात आला. पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे, सचिव आनंद परांजपे, क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टस लिमिटेडचे अनिल छाजेड आणि टी. एन. सुंदर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव रियाझ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निरंजन गोडबोले, ‘एमसीए’च्या निवड समितीचे सदस्य मंगेश वैद्य, भगवान काकड, कौस्तुभ कदम आदी उपस्थित होते. निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अंतिम सामन्याचा निकाल :
संयुक्त जिल्हा संघ : ४५ षटकांत ८ बाद २६४ धावा, किरण चोरमले ५८ (८०,५x४), प्रथमेश बाजारे ५५ (४२, ५x४, २x६), अभिषेक पवार ४४ (४७, ६x४, १x६), अनिकेत नलावडे २८ (२७), क्षितिज पाटील १९, सचिन धास २१, कौशल तांबे २-३५, प्रद्युम्न चव्हाण २-४२, अर्शिन कुलकर्णी १-३९, राझीक फल्लाह १-४४ वि. वि. केडन्स क्रिकेट अकादमी : ३९ षटकात सर्वबाद २१६ धावा, अर्शिन कुलकर्णी ४९ (३७, ४x४, ४x६), अथर्व धर्माधिकारी ४५ (६२, ५x४), प्रद्युम्न चव्हाण २१, कौशल तांबे १९, हर्षल काटे १३, आर्य जाधव १६, दिग्विजय पाटील नाबाद १६, क्षितिज पाटील २-४२, प्रथमेश बाजारे २-४७, किरण चोरमले २-३३ ; सामनावीर-प्रथमेश बाजारे; संयुक्त जिल्हा संघ ४८ धावांनी विजयी.
अन्य पारितोषिके :
सर्वोत्कृष्ट फलंदाज : अभिषेक पवार (संयुक्त जिल्हा, ३२०धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : प्रथमेश बाजारे (संयुक्त जिल्हा, १६ बळी)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : हर्षल काटे (केडन्स, ४ झेल, ३ धावबाद)
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक : शिवम ठोंबरे (पीवायसी, ५ झेल, १धावबाद, १यष्टीचीत)
मालिकावीर : कौशल तांबे (केडन्स, २६१ धावा व ७ विकेट)