पुणे : शहरभर स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करणाऱ्या महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्येच अस्वच्छता पसरली आहे. एवढेच नव्हे तर जुन्या इमारतीच्या मजल्या मजल्यावर व्हरांड्यातच फाईलींचे गठ्ठे, जुन्या कागदपत्रांचे गठ्ठे, नादुरुस्त साहित्याचे ढीग लागलेले आहेत. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी-अधिकारी आणि नागरिकांनाही चालताना अडचण होत आहे.
शहरात सध्या स्वच्छ भारत अभियानाची तयारी सुरु आहे. नागरिकांना ओला सुका कचरा वर्गीकरण करुन देण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. यासोबतच रस्त्यांवर, चौकांमध्ये स्वच्छता ठेवण्याकडे लक्ष दिले जात आहे. नागरिकांना ५०० रुपयांपासून पाच हजारांपर्यंतचा दंड केला जात आहे. परंतु, पालिकेची अवस्था मात्र ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ अशी झाली आहे.
पालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, सर्व गटनेते यांच्यासह विविध समित्या आणि नगरसचिव कार्यालय असे कक्ष आहेत. हे सर्व कक्ष पूर्वी जुन्या इमारतीमध्ये होते. जुन्या इमारतीमधील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही अस्वच्छता प्रामुख्याने आढळून येते आहे.
नादुरुस्त झालेले तसेच बदलण्यात आलेले विद्युत साहित्य, टेबल खुर्च्या, कपाट अशा साहित्याने व्हरांडे भरुन गेले आहेत. यासोबतच जुन्या फाईल्स, कागदपत्रे, अहवाल, बिले आदी कागदपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे बांधून ठेवण्यात आले आहेत. यामुळे वर्दळीची जागा अडली असून महिनोन्महिने हे साहित्य याठिकाणी पडून आहे. हे साहित्य दूर करुन जागा मोकळी करण्याची आवश्यकता आहे.
फोटो : लक्ष्मण लॉगीनमध्ये पीएमसी नावाने फोल्डर