राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणेहून सातारा बाजूकडे जाताना टोलच्या पावतीवरून टोलनाक्यावर वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये तरुणास मारहाण करून वाहनातील महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारण्यासाठी हात उचलला होता. ही घटना गंभीर असल्याने राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी सदर वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले. ते वाहन मुंबई जुहू येथील असल्याचे दिसून आले. त्यानंतर राजगड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे एक पथक मुंबईला रवाना करून तक्रार दाखल करण्यात आली. शनिवार दि.३ रोजी आनंद जनार्दन कोकरे (वय ३०, रा. जुहू एकता सोसायटी, रु. नं. ५१४, न्यू लिंक रोड, जुहू, अंधेरी पश्चिम) याने घडलेली घटना सांगून तक्रार दाखल केली. या प्रकरणी शैलेश चंद्रकांत निवंगुणे व ओंकार रोहिदास कोंडे (रा. खेड, शिवापूर टोलनाका) अशी त्या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोघा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी सांगितले.
खेड-शिवापूर टोल नाक्यावर महिलेस मारहाण करणाऱ्या दोन तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST