भिगवण : तीन महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाणी नळजोडाला विरोध केल्याच्या कारणावरून दोन महिलांना लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे घडली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बेकायदा गर्दी जमवून महिलांना मारहाण केल्याचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.याविषयी भिगवण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभारगाव येथे बुधवारी रात्री दीपक माणिक कनीचे हे पत्नी लक्ष्मी कनीचे आणि मेहुणी आशाबाई सत्यवान कनीचे यांना दुचाकीवर बसवून घरी जात असताना शेजारी राहणाऱ्या आजिनाथ लालमन कनीचे यांनी त्यांना अडवून तीन महिन्यांंपूर्वी पिण्याचे पाण्यासाठी अडवणूक केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण सुरु केली. या वेळी अक्षय आजिनाथ कनीचे, चंद्रकात बाबूराव कनीचे, सोमनाथ बबन परदेशी, सागर बबन परदेशी, संतोष बबन परदेशी, वैशाली कैलास केवटे यांनीही खोऱ्याच्या लाकडी दांडके काठ्या हातात घेत महिलांना मारहाण केली. यात लक्ष्मी आणि आशाबाई जबर जखमी झाल्या. दोन्ही महिलांच्या डोक्याला, हाताला, तसेच मानेच्या आणि बरगडीच्या हाडाला मार लागला आहे. यात एकीच्या खांद्याचे हाड मोडले आहे. तर लाथाबुक्क्यांनी पोटालाही जास्त मार लागला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या महिलांना भिगवण आय.सी.यू. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फिर्यादी दीपक माणिक कनीचे यांच्या फिर्यादीवरून भिगवण पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
नळजोडाला विरोध केल्याने दोन महिलांना मारहाण
By admin | Updated: March 31, 2017 02:38 IST