ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ - लोणावळा - पुणे दरम्यान रेल्वेमध्ये मालाची विक्री करुन उदरनिर्वाह करणार्या दोन जणांना झोपेत असताना राहत्या घरात अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार इथल्या रेल्वे वसाहतीत उघडकीस आला आहे. या दुर्घटनेत अतुलसिंग भदौरिया याचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहकारी सचिन सिंग हा ८५ टक्के भाजला आहे. त्याला पुण्यातील ससुन रुग्णालयात दाखल केलं असुन तो मृत्युशी झुंज देत आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी या घटनेतील मयत अतुलसिंह रविवीरसिंह भदोरिया (वय २१) आणि जखमी सचिनप्रताप सिंह यांच्यासोबत सनी विजयपाल सिंह आणि अमित अजमिरसिंह भदोरिया याचे रेल्वे मध्ये पाणी विकण्यावरुन भांडण झाले होते. बुधवारी रात्री मयत अतुल आणि सचिन बराकी चाळीमधील त्यांच्या खोलीत झोपले असता पहाटे सव्वादोनच्या सुमारास खोलीतील गादी आणइ अंगावरील कपड्यांना अचानक आग लागली होती. तुम्ही आत मरा तुम्हाला कोण वाचवतो तेच पाहतो, असं अमितसिंह हा बाहेरुन ओरडत होता, असे तक्रारीमध्ये म्हटलं आहे.