पारवडी गावच्या हद्दीत गेल्या दहा वर्षांपासून खडीमशीन आहे. या खडीमशीनबाबत वाद-विसंवाद होऊन याबाबत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाद होऊ नये यासाठी भोर तहसीलदार अजित पाटील यांनी पारवडी येथील खडीमशीन प्लांटला घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वेळी खडीमशीनबाबत ग्रामस्थांमधील दोन गटांत विसंवाद असल्याचे दिसून आल्याने तहसीलदार पाटील यांनी दोन्ही गटांकडील ग्रामस्थांना सकारात्मक चर्चा करण्याचे आवाहन करून खडीमशीनची पाहणी केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या प्लांट परिसरातील शेती, विहीर आदीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या वेळी मंडलाधिकारी श्रीनिवास कडेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, नेहा बंड, अर्चना ठाकूर, ग्रामसेविका पाटोळे, पोलीस कर्मचारी अक्षय वायदंडे या वेळी उपस्थित होते.
या वेळी येथील ग्रामस्थ किसन लिम्हण, किरण शिळीमकर, राजाराम लिम्हण, शिवाजी शिळीमकर, संतोष लिम्हण, सुलाबाई लिम्हण यांनी आम्हाला यामुळे कोणताही त्रास अथवा शेतीचे नुकसान झाले नाही, आमच्या घरांना कोणताही तडा गेला नसल्याचे सांगून खडी मशीनचे समर्थन केले. तर चालक विनोद मांगडे यांनी सांगितले कि, रीतसर सर्व परवानग्या घेऊन आम्ही परवाना नूतनीकरण केले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी स्प्रिंकलर पाण्याची सोय असून खडीमशीनभोवती उंच पत्र्याची संरक्षक भिंत उभी केली आहे. गावच्या राजकारणामुळे गेल्या दोन वर्षांपासून आमच्या व्यवसायाला त्रास होत असून गावच्या विकासासाठी आमचे नेहमी योगदान राहिले आहे. खडीमशीन गावापासून लांब असल्याने गावास कोणताही त्रास होत नसून अनेक ग्रामस्थ आम्हाला सहकार्य करत आहेत. तर दुसऱ्या बाजूने खडीमशीनमुळे गावाला धोका होत असल्याचे पोलीस पाटील सुभाष लिम्हण यांनी तहसीलदार अजित पाटील यांच्याकडे ग्रामस्थांची बाजू मांडली आहे.