पुणे : इमारतीच्या खाली बसण्यावरून झालेल्या क्षुल्लक कारणावरून आंबेगावात दोघांनी रिक्षा पेटवून दिली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून या प्रकरणी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय राजाराम म्हसुडगे (वय २२), शुभम बालू हिरणवाळे (वय १९, रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सीताराम रांजणे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली होती. आंबेगाव येथील हर्षविहार बिल्डिंगखाली सीताराम रांजणे यांनी २५ एप्रिल रोजी रिक्षा लावलेली असताना रात्री बाराच्या सुमारास ती ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आली होती. त्याचबरोबर त्या रिक्षाशेजारी लावलेल्या वाहनांचेही नुकसान झाले होते. यामध्ये वाहनांचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. भारती विद्यापीठ पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात होता. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका पुलाखालून दोघांना अटक केली. दोन महिन्यांपूर्वी बिल्डिंगच्या खाली बसू नये, म्हणून झालेल्या वादातून आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, उपनिरीक्षक समाधान कदम, अमोल पवार, प्रणव संकपाळ, कुंदन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
रिक्षा पेटवणाऱ्या दोघांना अटक
By admin | Updated: April 29, 2017 04:19 IST