दौंड : दौंड तालुक्याच्या राजकारणात रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्या गटातटाच्या राजकारणात मनोमिलन घडविण्यात पक्षनेतृत्वाला गेल्या अनेक वर्षापासून अपयशच आल्याने यंदाच्या निवडणुकीतही बंडखोरीचा धोका पक्षापुढे आहे. लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याच्या निमित्ताने विरोधकांना बळ मिळाल्याने तालुक्यात चौरंगी लढत रंगणार आहे.
दौंड तालुका हा शरद पवार यांना मानणारा तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु, गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे येथील राजकारणच चुकत गेले. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला गेल्या वेळी पराभवही पत्काराव लागला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तर खुद्द शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे 25 हजार मतांनी मागे पडल्या. तालुक्यात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी घेतलेली मतांची आघाडी पाहून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे काही इच्छुकच घडय़ाळ चिन्हावर लढावे की नाही या संभ्रमात आहेत.
राष्ट्रवादीच्या चिन्हावर विद्यमान आमदार रमेश थोरात निवडणूक लढवतील अशी राजकीय मंडळीत चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे तिकिट मिळाले नाही तरी कुठल्याही परिस्थितीत अपक्ष निवडणूक लढविण्याचा चंग उद्योगपती विकास ताकवणो यांनी बांधला आहे.
दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक विरधवल जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार हे देखील राष्ट्रवादीकडून इच्छूक आहेत.
भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल
कुल यांनी दौंड तालुका विकास आघाडी आणि नागरिक हित संरक्षण मंडळाच्या माध्यमातून उमेदवार
म्हणून निवडणुकीची तयारी सुरु
केली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉँग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत. कोणाही एका गटाला जवळ केल्यास दुसरा गट नाराज होणार हे निश्चि आहे. युतीच्या जागावाटपात हा मतदार संघ भाजपाच्या वाटय़ाला असल्याने ज्येष्ठ नेते वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणो हे दोघेही इच्छूक आहेत. ‘कुल-थोरात’ प्रमाणोच ‘काळे-ताकवणो’ यांचे विळ्य़ा भोपळ्य़ाचे राजकारण सर्वश्रृत आहे. युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. जानकर यांना मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर रासपकडून ही जागा मागितली जाऊ शकते. राष्ट्रवादीमधील काही इच्छुक मंडळीही त्यांच्याकडे या निमित्ताने जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.
मनसेचे राजाभाऊ तांबे, जनता दलाचे अॅड. बापूसाहेब देशमुख यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली
आहे. दौंड मतदारसंघातील प्रत्येकच पक्षात गटबाजीचे राजकारण असल्यामुळे सर्वानाच त्याचा फटका बसणार आहे. (वार्ताहर)