निमोणे : शिदोडी (ता. शिरूर) येथील घोड नदीपात्रात सुरू असलेला अवैध वाळूूउपसा बंद करावा, अशा मागणीचे निवेदन शिंदोडी ग्रामपंचायतच्या वतीने थेट मुख्यमंत्र्याकडेच करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याची त्वरित दखल घेत महसूल आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले त्यामुळे वाळूमाफियांची पळापळ सुरू झाली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिंदोडी (ता. शिरूर) येथील घोडनदीच्या पात्रात गेली कित्येक दिवस राजरोसपणे बोटींच्या सहाय्याने अवैध वाळूउपसा चालू आहे. शिंदोडी गावच्या हद्दीत वाळूउपसा करत तो श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत नेऊन ठेवला जातो. कारवाईची खबर मिळताच दुसऱ्या हद्दीत पसार होणे व वातावरण निवळले की पुन्हा अवैध वाळूउपसा करत नदीपात्राचे लचके तोडायचे, असा उद्योग राजरोसपणे चालू आहे. यामुळे पर्यावरणाची व नदीपात्राची मोठी हानी होत असून लगतच असणाऱ्या घोड धरणाला याची थेट धोका पोहचू शकतो. शिवाय यांत्रिक बोटींमधून गळणारे डिझेल, ऑईल यामुळे पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याशिवाय याठिकाणाहुन परिसरातील शिंदोडी, गुनाट, न्हावरा, निर्वी, उरळगांवसह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना याच जलाशयातून असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास ही धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे हा अवैध वाळूउपसा बंद करण्याची शिंदोडी ग्रामपंचायतने मागणी केली असून बंद न झाल्यास तहसील कार्यालयापुढे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मागणीचे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलव्दारे पाठविण्यात आले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने या पत्राची त्वरित दखल घेत महसूल आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहे.
--
या भागातील अवैध वाळूउपशाची विषवल्ली प्रशासनाने समूळ नष्ट करावी. पर्यावरणाची हानी टाळून जलचर व मानवी जिवीतीचे रक्षण करावे. वाळूमाफिया व त्यांना साथ देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. - अरुण खेडकर, सरपंच शिंदोडी