मार्गासनी : आंबवणे (ता. वेल्हे) येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शनिवारी (दि. १२) पहाटे चोरट्यांनी प्रवेश करून बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी न उघडल्याने तेथील २ संगणकाचे अंदाजे २० हजार रुपये किमतीचे मोडेम व राऊटर घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत शाखा व्यवस्थापक श्रीकांत देशपांडे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास बँकेचे शिपाई संपत कांगडे यांनी साफसफाई करण्यासाठी बँकेचा मुख्य दरवाजा उघडला असता, त्यांना मागील दरवाजा मोडलेला दिसला. दरवाजाबाहेरील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे लक्षात येता त्यांनी याबाबत व्यवस्थापक देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. देशपांडे यांनी पोलिसांना याबाबत कळवल्यावर उपविभागीय अधिकारी वैशाली कडुकर, सहायक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पुण्यातून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यांनी बँक शाखेत येऊन पाहणी केली असता, बँकेमधील दोन्ही तिजोऱ्या चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. मात्र, तिजोरी उघडू शकली नाही. शाखेमधील इंटरनेटचे दोन मोडेम व त्याचे राऊटर त्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ म्हणाले, ‘‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री सव्वादोनच्या सुमारास पाच चोरट्यांनी बँकेत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. त्या फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे.’’(वार्ताहर)बँक बंद; व्यवहार ठप्पबँकेतील कामकाजाचे मोडेमच चोरीस गेल्याने ऐन गर्दीच्या वेळी बँकेचे कामकाज आज दिवसभर बंद ठेवावे लागले. त्यामुळे नोटा भरण्यासाठी व बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. बँकेच्या सुरक्षेबाबत या वेळी ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, व्यवस्थापक देशपांडे यांनी बँकेचे कामकाज उद्या (रविवारी) सुरळीत चालू होईल, असे सांगितले.बँकेची सुरक्षा रामभरोसे....आंबवणे येथील स्टेट बँकेचे वेल्हे ते नसरापूरपर्यंत कामकाज चालते. मोठी उलाढाल असलेल्या या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा एका अत्यंत साध्या बंगल्यात असून सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. चोरट्यांनी ज्या ठिकाणावरून आत प्रवेश केला, त्या ठिकाणी झाडेझुडपे वाढलेली आहेत. रात्रीची लाईट व्यवस्था नाही. कोणताही सायरन बसवलेला नाही. दरवाजावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. आतील लाकडी दरवाजावर फक्त एक लोखंडी दरवाजा आहे. त्याचे कुलूप तोडून व लाकडी दरवाजा मोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आहे. या बँकेला व बँकेच्या एटीमला सुरक्षारक्षक नाही. तर, वेल्हे पोलिसांनी याबाबत वेळोवेळी बँकेला लेखी सूचना दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिली.
आंबवणेत बँक लुटण्याचा प्रयत्न
By admin | Updated: November 13, 2016 04:16 IST