पुणे : ‘सरल’ प्रणालीमध्ये भरण्यात आलेली माहिती पुन्हा ‘शगुन’मध्ये भरावी लागू नये, म्हणून दोन्ही प्रणाली एकमेकांना जोडण्यासाठी अधिका-यांशी चर्चा केली जाईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे स्पष्ट केले.पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते म्हणाले, शिक्षण विभागाने विद्यार्थी, शिक्षक, संस्थांची सर्व माहिती ‘सरल’ भरणे बंधनकारक केले आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये माहिती भरताना शिक्षकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.तांत्रिक अडचणींमुळे हे काम पूर्ण होत नसल्याने, चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. ग्रामीण भागातील शिक्षकांना रात्रभर जागून हे काम पूर्ण करावे लागले. हे काम सुरू असतानाच, आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नवीन ‘शगुन’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यावरही ‘सरल’प्रमाणेच माहिती भरावी लागणार आहे, तसेच शाळांमधील उपक्रमांचे व्हिडीओ, छायाचित्रेही टाकावी लागणार आहेत. त्यामुळे शिक्षकांचे काम आणखी वाढणार आहे.आॅनलाइन पद्धतीवर काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याविषयी ते म्हणाले, ‘सरल’ माहिती पुन्हा ‘शगुन’वरही भरावी लागणार नाही. ही माहिती आपोआप ‘शगुन’वर जाईल, यासाठी अधिका-यांशी बोलून प्रयत्न केले जातील. देशातील दहा सार्वजनिक व दहा खासगी विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येणार आहे. कोणतेही विद्यापीठ त्यासाठी अर्ज करू शकते. त्यातून योग्य विद्यापीठांची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती १५ दिवसांत स्थापन केली जाईल. विद्यापीठांचे केवळ रँकिंग बघून त्यांची निवड केली जाणार नसून, त्यांचे पुढील काही वर्षांचे व्हिजनही पाहिले जाईल.
‘सरल’ला ‘शगुन’शी जोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:57 IST