येरवडा : समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारे लेखन म्हणजे खरे साहित्य असते. प्रत्येक माणूस स्वत:शी बोलत असतो. पारतंत्र्याला पराभूत करण्याची प्रेरणा देणारी माणसंच थोर आहेत, नाहीतर कोणीच स्वतंत्र नाही. समाजात थोर माणसं नसती तर साहित्यकारांनाही सामाजिक साहित्य लिहिता आले नसते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मु. शिंंदे यांनी केले. टिंंगरेनगरमध्ये सुयोग वाचनालयाच्या वतीने आयोजित तिसऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन फ. मु. शिंंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार जगदीश मुळीक, स्थायी समितीचे अध्यक्ष बापू कर्णे (गुरुजी), सुयोग वाचनालयाचे संचालक रवी जैन, अंजली जैन, व्यवस्थापिका संतोषी भोपळे, माजी नगरसेवक हुलगेश चलवादी, चंद्रकांत जंजीरे, संदीप पूरकर, अशोक देशमुख उपस्थित होते. शिंदे म्हणाले, की समाजात चांगली कामे करणारी माणसं आहेत व त्यांच्यावरच हे जग चालत आहे. आपल्याकडे सगळ्या सुख-सुविधा आहेत. मात्र त्याबरोबरच वृद्धाश्रमही आहेत, ही समाजाची शोकांतिका आहे. सुयोग वाचनालयापासून विद्यानगर परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी बाबा परीट यांनी कथाकथन सादर केले, तर प्रशांत मोरे, तुकाराम धांडे, घनश्याम धेंडे, भरत दौंडकर, धनंजय सोलंकर, विष्णू थोरे, रुपाली अवचरे, अस्मिता जोगदंड, पुरुषोत्तम सदाफुले या कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. एड्सग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या दत्ता बारगजे व संध्या बारगजे या दाम्पत्याला ‘स्वर्गीय शकुंतला जयकुमार जैन कृतज्ञता पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.
समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारेच खरे साहित्य
By admin | Updated: January 21, 2015 00:40 IST