धनकवडी : बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान कात्रज घाटामध्ये अरुंद वळणावर तिहेरी अपघात झाला. यामध्ये दोन बसचे नुकसान झाले असून, स्वारगेटकडे येणाऱ्या बस चालकाने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. पण बस पावसाळी पाण्याच्या नाल्यात गेली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. पुण्याहून भोरकडे जाणाऱ्या बसला (एमएच ०७ सी ७२८६) वळणावर एका ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी समोरून कोल्हापूर-स्वारगेट ही बस (एमएच ०६ एस ८३४०) येत होती. चालक शिवाजी काळे यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला नेली. त्यामळे अपघात टळला. मात्र, ज्याच्यामुळे हा अपघात घडला तो ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळावरून निघून गेला.अपघातग्रस्त गाडीला मदत करण्यासाठी स्वारगेट-भोर बसच्या चालकाने बस उभी केली. त्या वेळी साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या दुधाच्या टॅँकरने बसला धडक दिली. या अपघातास कारणीभूत असणारा ट्रकचालक पळून गेला. त्याचा शोध घेणे दूरच, पण ज्यांच्या प्रयत्नामुळे प्रवाशांचे प्राण वाचले त्यालाच गाडीचा वेग जास्त असल्याचे कारण देत पोलिसांनी कसुरदार ठरविण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
कात्रज घाटात तिहेरी अपघात
By admin | Updated: March 19, 2015 00:25 IST