केडगाव: दौंड तालुक्यातील पारगाव येथे होले फार्म हाऊस समोर चार बिबट्यांचा समुह सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये एक बिबट्या व तीन बछड्यांचा समावेश आहे. यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.
दौंड तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दशहत वाढत आहे. पारगाव येथे दिलीप होले यांचा शेतातील फार्म हाऊसवर गुरूवारी (दि ७) रात्री चक्क चार बिबटे फार्म हाऊसच्या आवारात मुक्त संचार करत होते. रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने दिलीप होले बाहेर आले. त्यांना चार बिबटे मुक्त संचार करतांना दिसले. त्यांनी घाबरून घराची दारे बंद केली. ही घटना त्यांनी वनविभागाला कळवली आहे.
चौकट
पारगाव परिसरात बिबट्यांची दशहत वाढत चालली आहे. वनविभागाने या परिसरातून चार बिबटे जेरबंद केले आहेत. उसाची शेती असल्याने या परिसरात अनेक बिबट्यांचा वावर आहे.
वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी सरपंच जयश्री ताकवणे यांनी केले आहे.
फोटो : पारगाव तालुका दौंड येथील दिलीप होले यांच्या फार्महाउस च्या कडेने मुक्तपणे संचार करत असलेले बिबटे