पुणो : सिंहगड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेकडून नदीपात्रलगतच्या रजपूत झोपडपट्टी ते कृष्णसुंदर गार्डन दरम्यानचा रखडलेला रस्ता येत्या काही महिन्यांत मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यासाठी लागणारी जागा ताब्यात देण्यास संबंधित जागा मालकाने तयारी दर्शविली असून, त्यासाठी द्याव्या लागणा:या भरपाईसाठी जागा मालकाला 11 कोटी रुपयांचा खर्च येणार असून, हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली.
शहरातील चौकांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने नदीपात्रच्या कडेने रस्ता तयार केला आहे. महापालिका भवन, डेक्कन परिसर ते म्हात्रे पुलाजवळ असलेल्या रजपूत झोपडपट्टीर्पयतचा रस्ता पालिकेने तयार केलेला आहे. मात्र रजपूत झोपडपट्टीपासून म्हात्रे पुलाच्या बाजूस जोडण्यासाठीची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने या रस्त्याचे काम गेली अनके वर्षे रखडलेले आहे. परिणामी सिंहगड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा बोजाही वाढलेला आहे. हा ताण कमी करण्यासाठी राजाराम पूल ते म्हात्रे पुलार्पयत शंभर फुटी डीपी रोड पालिकेने तयार केल्याने सिंहगड रोड, कोथरूडसह, कर्वेनगर परिसरात राहणा:या नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. परंतु, म्हात्रे पुलापासून नदीकाठच्या रस्त्याला जोडणारा मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांना मेहेंदळे गॅरेजच्या चौकापयर्ंत जाऊन तिथून रजपूत झोपडपट्टीच्या चिंचोळ्या रस्त्याने जावे लागते. हा रस्ता मार्गी लागल्यास वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याने महापालिका आयुक्तांनी यामध्ये जागा मालकाशी चर्चा करून जागा देण्याची विनंती केली. त्यानुसार पथ विभागाने याचा प्रस्ताव तयार केला असून, 25 गुंठे जागा बाजारभावाच्या दराने ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.