पिंपरी : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाच्या कामासाठी पोलिसांकडून पास देण्यात येत आहे. मात्र अशाच पद्धतीचा बनावट पास तयार करून एकाने पिंपरी-चिंचवड ते कोल्हापूर दरम्यान प्रवास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.संदीप शंकर कापसे (वय ३५, रा. पिंपळे गुरव, पिंपरी-चिंचवड, मुळ गाव नंदनवाड, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कापसे नोकरी करीत असून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथे वास्तव्यास आहे. लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही त्याने पिंपळे गुरव ते कोल्हापूर जिल्ह्यातील नंदनवाड या गावापर्यंत प्रवास केला. त्याच्या मूळगावी नंदनवाड येथे तो गेला. याबाबत गडहिंग्लज वैद्यकीय अधिकारी यांना माहिती मिळाली. कोरोनाग्रस्त रुग्ण जास्त असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड तसेच कोल्हापूर शहर रेडझोनमध्ये आहे. या शहरांतून आरोपी याने प्रवास केल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी गडहिंग्लज पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आरोपी याला होम क्वारंटाईन केले. दरम्यान, गडहिंग्लज पोलिसांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधून आरोपी याने प्रवासासाठी वापरलेल्या पासबाबत चौकशी केली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा हा बनावट पास असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी याच्याविरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४६८, ४७१, २६९, २७०, १८८, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ कलम ३, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब ), महाराष्ट्र कोविड उपाययोजना २०२० चे नियम ११ अन्वये सोमवारी (दि. २०) गुन्हा दाखल केला आहे.
'त्याने' पोलिसांचा बनावट पास तयार करत पिंपरी-चिंचवड ते कोल्हापूर केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 22:35 IST
अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाच्या कामासाठी पोलिसांकडून पास
'त्याने' पोलिसांचा बनावट पास तयार करत पिंपरी-चिंचवड ते कोल्हापूर केला प्रवास
ठळक मुद्देपुणे व पिंपरी-चिंचवड तसेच कोल्हापूर शहर रेडझोनमध्ये