लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अन्नधान्यापासून ते पीपीपी किटपर्यंत सर्व वस्तूची वाहतूक करणाऱ्या एसटीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच आंब्याची वाहतूक केली. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. पुण्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथून जवळपास २० मालवाहतूक करणाऱ्या एसटी गाड्या भरून आंबा दाखल झाला. यातून जवळपास ४० हजार डझन आंब्याची वाहतूक झाली.
आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीने मागील वर्षीपासून मालवाहतुकीवर भर दिला. लॉकडाऊनच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात एसटीची मालवाहतूक सुरू होती. आतापर्यंत एसटीने मालवाहतुकीतून ५१ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणात आंबे वाहतूक सुरू झाली. स्वारगेट, वाकडेवाडी व पिंपरीच्या आगारात या गाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे एसटीला चांगले उत्पन्न मिळत आहे. शिवाय कोकणातील आंबे उत्पादकांचा मालही बाजारात पोहचतो आहे.
कोट
रत्नागिरीतून पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आदी ठिकाणी एसटीच्या महकार्गो या मालवाहतूक करणाऱ्या गाडीतून आंबे पाठवले आहे. यात सर्वांत जास्त आंबे पुणे व मुंबईला पाठविण्यात आले. आंबेविक्रेते व उत्पादक यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी, राज्य परिवहन महामंडळ