चिंचवड : अद्याप मिसरूडही न फुटलेली पोरं ट्रिपल सीट डोळ्यासमोरून झपकन निघून जातात...मोबाईलवर रुबाबदारपणे बोलत तरुण एकेरी मार्गातून बाहेर पडतात...फॅमिली म्हणून पाच जणांचे ‘कुटूंब’ दुचाकीवरून बिनधास्त जाते...लाल दिवा असूनही सर्रासपणे पुढे जाणारे सुशिक्षित लोक आणि हे सारे पाहूनही न पाहिल्यासारखे करणारे वाहतूक पोलिस असे चित्र शहरात दिसते. याला कारण म्हणजे पोलिसांचे झालेले खच्चीकरण! केवळ अडविले या कारणावरून नगरसेवकाला राग आला आणि अडविणाऱ्या धडाडीच्या महिला पोलिसाला थेट बदलीला सामोरे जावे लागले. सोमवारी चिंचवडमध्ये घडलेले हे एक उदाहरण. अशा अनेक प्रसंगांना कॉन्स्टेबलना सामोरे जावे लागते.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी हटकले, तर लगेच मी कोण माहिती आहे का? एखाद्या संघटनेचा अथवा पक्षाचा पदाधिकारी आहे, असे ठणकावून सांगून कारवाई करू नये, अशा अविभार्वात संभाषण सुरू होते. कधी आमदार, खासदारांनाही थेट फोन लावले जातात. संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या हातात मोबाईल दिला जातो. समोरची व्यक्ती कोण आहे, कोणाशी संबंधित आहे, याची काही कल्पना नसते. (वार्ताहर)-पिंपरी बाजारपेठेतील वाहतूकव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी तैनात केले, त्यांनी शिस्तीचा बडगा दाखवला, तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाईच्या हालचाली सुरू होतात. वरिष्ठांकडे तक्रारीची निवेदने दिली जातात. वाहतूक पोलीस अडवणूक करून पैसे उकळतात, अशा तक्रारी देऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्रास दिला जातो. अशा घटना पिंपरीत घडलेल्या आहेत. कारवाई केली तर वरिष्ठांकडे तक्रारी, नाही केली तर मनमानी, बेशिस्तीचे दर्शन घडते. अशा स्थितीत त्या ठिकाणी काम करायचे कसे असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडतो. सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असल्याची पाटी लावून जणूकाही बेशिस्त वाहन चालविण्यास मुभा मिळाली आहे, अशा आविर्भावात वागणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे वाहतूक पोलिसांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.-नगरसेवकांनी दिलेल्या पत्राची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. पिंपरी कॅम्प परिसरात सरग यांनी बेशिस्त व्यापाऱ्यांच्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला होता. या वेळीही अनेक राजकीय व्यक्ती व व्यापाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. राजकीय दबावामुळेच सरग यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. अशा दबावामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यात अडचणी येत असल्याच्या अलेक घटना घडल्या आहेत.एका नगरसेवकाच्या अर्जाचा विचार करून माझी बदली होणे हे धक्कादायक आहे. १०० रुपये दंडाची पावती दिली होती. मात्र, पावती न देता तो वाहनाचालक निघून गेला. व त्याने नगरसेवकाला जाऊन चुकीची माहिती दिली. नगरसेवकांनी कर्मचार त्यांच्या फोनवर बोलले नाहीत. हा राग मनात ठेऊन वरिष्ठांकडे अर्ज केला. अशा अर्जाची दखल घेतली जाते, हे आश्चर्य आहे.- अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक
वाहतूक पोलीस खच्ची!
By admin | Updated: June 17, 2015 23:40 IST