मनोहर बोडखे । लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : दौंड शहरातील वाहतुकीची कोंडी ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावत आहे. परंतु, या समस्येवर आजपावेतो कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याने दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मात्र, नगर परिषदेचेदेखील उदासीन धोरण वाहतुकीच्या कोंडीला कारणीभूत ठरत आहे.मुळात शहरातील रस्ते अपूर्ण स्वरूपात आहेत. त्यातच काही व्यापाऱ्यांचे रस्त्यालगत झालेले अतिक्रमण यामुळे छोट्या-मोठ्या वाहनांची कोंडी होत आहे. विशेषत: संभाजीचौक ते हिंद टॉकीज तसेच रेल्वे कुरकुंभ मोरी, गांधीचौक या परिसरात वाहतुकीची कोंडी नेहमीच होत असते. यातूनच छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर भीमथडी शिक्षण संस्था असून, या वाहतुकीचा कोंडीचा विशेष फटका शाळेतील विद्यार्थ्यांना बसत असतो. शिक्षण संस्थेनेदेखील वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पत्र दिलेले आहे. मात्र, पोलिसांचे याकडे आजपावेतो दुर्लक्ष आहे. रेल्वे कुरकुंभ मोरी, शालीमारचौक, अहिल्यादेवी होळक़र सहकार चौक, स्टेट बँक या परिसरात देखील वारंवार वाहतुकीची कोंडी होते. मात्र, ही कोंडी सोडविण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते येऊन वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मदत करतात. मात्र, पोलिसांचा थांगपत्ता नसतो.शहरातील अरुंद रस्ते, त्यातच काही व्यापाऱ्यांचे रस्त्यालगत अतिक्रमण यामुळे रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी मोठ्या वाहनांसह दुचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागते. रस्त्यालगतची दुकाने, बँका, शसकीय कार्यालय यांच्या बाहेर रस्त्यावरच अनेक दुचाकी उभ्या असतात. त्यामुळे वाहनांना मार्ग मिळत नाही. पर्यायाने वाहनांची वाहतूक रखडते.
दौंडमध्ये वाहतुकीची कोंडी ठरतेय डोकेदुखी
By admin | Updated: May 11, 2017 04:05 IST