पुणे : सरकारने जप्त केलेली तूरडाळ संबंधित व्यापाऱ्यांकडून हमीपत्र घेऊन खुल्या बाजारात १०० रुपये किलो दराने विक्री करण्याचे बंधन व्यापाऱ्यांना घालण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले आहे. परंतु, पुणे जिल्ह्यासह विभागातील एकाही जिल्ह्यात प्रशासनाने केलेल्या कारवाईत तूरडाळ सापडलीच नाही. यामुळे पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील नागरिकांना शासनाची १०० रुपये किलोची तूरडाळ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.बापट यांनी बुधवारी नागरिकांना १०० रुपये किलो दराने तूरडाळ मिळणार असल्याचे जाहीर केले. यामुळे पुण्यात केव्हापासून व कोठे १०० रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध होणार, अशी चौकशी करणारे अनेक फोन जिल्हा प्रशासनाला आले. याबाबत पुरवठा विभागाचे उपायुक्त प्रकाश कदम यांनी सांगितले, की जिल्ह्यात १०० ते १५० व्यापाऱ्यांवर कारवाई केली; पण या कारवाईत एकाही व्यापाऱ्याकडे डाळीचा अतिरिक्त साठा सापडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना १०० रुपये किलो दराची डाळ मिळणार नसल्याचे कदम यांनी सांगितले.
पुण्यात तूरडाळ महागच
By admin | Updated: November 6, 2015 03:15 IST