शेलपिंपळगाव : बाजारात टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे उत्पादन निघूनही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, पिकाची तोडणी लांबणीवर जात असून, बागेतच टोमॅटो खराब होऊ लागले आहेत. वातावरणाच्या विपरीत परिस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मेहनतीने फळांच्या बागा यशस्वी केल्या; परंतु पीक तोडणीच्या काळातच बाजारात पिकाचे दर आदळल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी शेती चासकमान व भामा-आसखेड धरणांतील पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने खरीप, रब्बी हंगामांव्यतिरिक्त उन्हाळी हंगामातदेखील विविध पिकांच्या लागवडीखाली असतात. विशेषत: रब्बी हंगामाच्या शेवटी मागास कांदा, बाजरी, टोमॅटो पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते. चालू वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या कांदाकाढणीनंतर टोमॅटो पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. रासायनिक औषधे आणि कठोर मेहनतीने लागवडयुक्त केलेल्या बागा सध्या यशस्वीरीत्या बहरून फळांनी लगडलेल्या आहेत. मात्र, तोडणीच्या काळातच बाजारात टोमॅटोचे दर नीचांकी पातळीवर आल्याने शेतकऱ्यांची कमालीची निराशा होत आहे. प्रतीनुसार १० किलोंना २० ते ४० रुपये, असा बाजारभाव मिळत असल्याने पिकावरील खर्चही उत्पादकांच्या हाती येत नाही.किमान १० किलोंना १२० ते १३० रुपये असा बाजारभाव टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित होता. मात्र, पडलेल्या बाजारभावामुळे बहुतांशी शेतकरी मालाची तोडणी लांबणीवर टाकत आहेत. त्यामुळे तोडणीला आलेली फळे सध्याच्या खराब हवामानाने वाया जात आहेत. टोमॅटो शेतातच ती झाडापासून तोडून फेकण्याची वेळ बळीराजावर आली आहे. किमान मागास लागवडीच्या टोमॅटो बागांना तरी चांगला बाजारभाव प्राप्त होण्याची आशा उत्पादक शेतकरी करीत आहे.
बाजारभावाअभावी टोमॅटो मातीमोल
By admin | Updated: January 14, 2017 03:03 IST