लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नऊ महिन्यांनंतर व्यावसायिक नाटकाचा पडदा उघडला आहे. नाटक मुंबईबाहेर जाण्यासाठी सज्ज झाले आहे. नाट्य व्यवसायाला उभारी देण्यासाठी मुंबई बाहेरील नाटकाच्या टेम्पो आणि बस प्रवासासाठी टोल माफी द्यावी, या मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नाटकांच्या गाड्यांना वर्षभर टोल माफी देण्यात आली आहे.
नाट्यव्यवसायाच्या वापराची परवानगी आणि आरसीबुकवर थिएटरचे नाव असणाऱ्या गाड्यांनाच टोलमाफी मिळणार आहे. खासगी गाड्यांचा यात समावेश नाही.
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की नाटयगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निर्मात्यांनी नाट्य निर्मिती खर्चात, कलावंतांच्या मानधनात काही प्रमाणात काटछाट केली आहे. परंतु नाटकासाठी गाड्या लागतात. इंधनाचे भाव कमी करता येत नाहीत. पण मुंबईवरून पुणे किंवा नाशिकला जायचे तर हजार-दीड हजार रुपयांचा टोल द्यावा लागतो.
त्यामुळे संघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मुंबई बाहेरील नाटकाच्या गाड्यांना टोल माफी देण्याची मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नाटकांचे सर्व प्रयोग सध्या पुण्यातच लागले आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे. राज्यात इतर ठिकाणचे प्रेक्षकही पुण्याप्रमाणे धाडस करतील अशी आशा आहे.
---------------------------------------------------------------------------