पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे. यातून वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न, योजना, प्रकल्प, विविध प्रश्नांना वाचा फोडली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणजे ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम चऱ्होली (प्रभाग ७) शनिवारी (१७ जानेवारी) दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमातून सामान्य नागरिक, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी चर्चा घडवून आणली जाते. चिंचवड, पिंपरी, शाहूनगर, भोसरी या प्रभागातून या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर हा उपक्रम चऱ्होलीत होणार आहे.महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेला भाग म्हणजेच चऱ्होली होय. आळंदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रभाग विकसित झाला आहे. या भागाची गाव ते महानगर अशी वाटचाल सुरू आहे. शेतकरी, कामगार, उच्च, मध्यमवर्गीय, कष्टकरी वर्ग वास्तव्यास आहे. या भागातील नागरी प्रश्नावर चर्चा घडावी, प्रश्न सुटावेत, याच उद्देशाने चऱ्होलीतील मंडईजवळ ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवक नितीन काळजे, नगरसेविका विनया तापकीर यांच्यासह प्रभाग स्तरावरील अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमोर अविकसित रस्ते, भाजी मंडईचा प्रश्न, उद्यानांचा अभाव, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाणी व्यवस्था, पदपथावरील दिवे, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण आदी प्रश्नावर सामान्य नागरिकांना मते मांडता येणार आहे. या प्रश्नावर चर्चा घडवून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
चऱ्होली प्रभागात आज लोकमत आपल्या दारी
By admin | Updated: January 17, 2015 00:13 IST