पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये झालेल्या तीन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. हडपसर, सिंहगड रस्ता आणि विमानतळ भागात हे अपघात घडले. विकास शहाजी लवांडे (वय २७, रा. फुरसुंगी) असे हडपसर येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालक मुकुंद अण्णा शिंदे (वय ५१, रा. कडबे गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. लवांडे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना शिंदे चालवीत असलेल्या बसची त्यांना आयबीएम कंपनीजवळ धडक बसली. हा अपघात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. तर भरधाव वाहनाने टेम्पोला दिलेल्या धडकेमध्ये टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर रविवारी पहाटे घडली. दिलीप नानासाहेब सासवडे (वय ५७, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांचा अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक फौजदार अंकुश शेळके यांनी फिर्याद दिली आहे. सासवडे खराडी बाह्यवळण रस्त्याने पुण्याकडे येत होते. त्या वेळी उलट्या दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर आरोपी चालक वाहनासह पसार झाला. विमानतळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरधाव पीएमपी बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री आठच्या सुमारास धायरी फाट्यावरील अमृत भेळ दुकानासमोर घडला. किशोर सुरेश शिंदे (वय ३२, रा. दामिनी हॉटेलजवळ, गारमाळ धायरी) हे रस्ता ओलांडत होते. त्या वेळी आरोपी उद्धव मोहन जंजीरे (वय ४७, रा. दगडू पाटीलनगर, थेरगाव) चालवीत असलेल्या पीएमपी बसची त्यांना धडक बसली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
अपघातांत तिघांचा मृत्यू
By admin | Updated: January 24, 2017 02:26 IST