लोणी काळभोर : नववर्षातील पहिल्याच अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीचिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसमवेत पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने थेऊरला जत्रेचे स्वरूप आले होते. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास श्रीचिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी चेतन आगलावे यांनी विधिवत महापूजा करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. पहाटे गर्दी कमी होती. सकाळी नऊनंतर भाविकांची वर्दळ वाढली. त्या वेळी दर्शनरांग थेट भिल्लवस्तीपर्यंत गेली होती. त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. चिंचवड देवस्थानच्या वतीने सकाळी सात वाजता ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे यांच्या उपस्थितीत मोरेश्वर पेंडसे यांनी महापूजा केली. भाविकांना देवस्थानच्या वतीने १०० किलोची उपवासाची खिचडी तर थेऊरगावातील तरुणांच्या चिंतामणी तरुण मंडळाच्या वतीने ३०० किलो साबुदाणा चिवड्याचे वाटप केले. संपूर्ण मंदिर आवार व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आगलावे बंधूंच्या वतीने दर्शनबारीवर मंडप आणि पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था तसेच भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या.भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे हे व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. याचबरोबर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, सुवर्णा हुलवान या अधिकाऱ्यांसमवेत १७ पोलीस कर्मचारी, होमगार्डसहित पोलीसमित्र असा चोख बंदोबस्त ठेवल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच पोलीस हवालदार मारुती पासलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन केल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला. मंदिरात श्रीचिंतामणी विजय ग्रंथाचे पारायण सुरू असून, त्याअंतर्गत रात्री भारतातील पहिल्या गणेश कथाकार हभप रुक्मिणीआई महाराज तारू व हभप एकनाथमहाराज तारू यांनी श्रीचिंतामणी जन्मोत्सव साजरा केला. चंद्रोदयानंतर आगलावे बंधंूनी श्री चिंतामणीची पालखी (छबिना) काढला. यात भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आज गर्दीचे प्रमाण जास्त होते. मागील महिन्यातीत गणेश जयंतीप्रमाणे या वेळीही मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पान, फूल, नारळ विक्रेत्यांनी रस्त्यालगतच टेबल मांडून विक्री सुरू केल्याने अगोदरच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद झाला. यामुळे हे अडथळे पार करून मंदिरापर्यंत पोहचावे लागत होते. भाविकांना याचा त्रास झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)मयूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी-मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे आज अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील भाविकांनी मयुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे चार ते रात्री उशिरापर्यंत सुमारे पाऊण लाख भाविकांनी मोरया मोरयाचा जयघोष करीत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने राज्यभरातील भाविकांनी तीर्थक्षेत्र मोरगाव येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनाला खुला करण्यात आला. सातारा, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, रायगड, नागपूर या जिल्ह्णातून भक्त दर्शनाला आले होते. दर्शनासाठी बाजारतळापर्यंत दिवसभर रांगा लागल्या होत्या.अंगारिकाच्या निमित्ताने नवसपूर्ती म्हणून मंदिराच्या दगडी फरसावर शेंगदाणा लाडु, केळी खिचडी, पेढे आदी पदार्थ भक्तांना वाटले जात होते. ही चतुर्थी केल्याने बारा चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते, अशी अख्यायिका असल्याने लाखो भक्त मयुरेश्वर दारी दर्शनाला आले होते. अंगारिकेच्या निमित्ताने पेठेतील दुकाने हार, दुर्वा, ‘श्रीं’ची प्रतिमांनी सजवली असल्याने मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते. मंदिरामध्ये अनेक भक्त मोरया मोरयाचा जयघोष करत असल्याने येथील वातावरण भक्तिमय झाले होते. आज होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने दर्शन रांग, पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षक आदी सोय तर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हजारोंनी घेतले चिंतामणीचे दर्शन
By admin | Updated: February 15, 2017 01:41 IST