हडपसर : भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रभागाला राष्ट्रवादीच्या नगरसेविका भारती कदम, शिवसेनेच्या संगीता ठोसर, मनसेचे वसंत मोरे यांच्या प्रभागातील भाग जोडून प्रभाग क्रमांक ४१ हा नवीन चार सदस्यीय प्रभाग तयार झाला आहे. त्यामुळे भाजपासमोर या प्रभागामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेचे मोठे आव्हान उभे राहून येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या चार सदस्यी प्रभागरचनेतील सर्वांत शेवटचा व शहराच्या सीमेवर असलेल्या प्रभाग ४१मध्ये कोंढवा बुदु्रकचा परिसर, नव्याने पालिकेत समाविष्ट झालेले येवलेवाडी गाव, कात्रज-सुखसागरनगरचा मोठा भाग जोडला आहे. या प्रभागात अनुसूचित जाती, ओबीसी महिला, महिला व खुला गट असे आरक्षण पडले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आलेल्या मोदीलाटेत या भागातील नागरिकांनी भाजपाला भरभरून मतदान केले. त्यापाठोपाठ झालेल्याविधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार योगेश टिळेकर यांनी या भागातून मोठे मताधिक्क्य मिळवीत अनपेक्षित विजय मिळविला. मात्र, त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या दोन पोटनिवडणुकीमध्ये या मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत या प्रभाग क्रमांक ४१ मध्ये काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्व पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोंढवा बुद्रुक प्रभाग क्र. ६२, येवलेवाडी गाव, कात्रज-सुखसागरनगर प्रभाग क्र. ७६, माऊलीनगर, गुजरवस्ती, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर, सुखसागरनगर भाग-१ हा भाग नव्याने जोडून प्रभाग क्र.४१ ची निर्मिती झाली आहे. नव्याने जोडलेल्या भागातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, यावरच निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. कोंढवा बुद्रुक प्रभाग क्र.६२ मध्ये भाजपाचे वर्चस्व असून, सेनेचाही मतदार मोठ्या संख्येने आहे. कात्रज-सुखसागरनगरमध्ये मनसे व राष्ट्रवादीचे चांगले प्राबल्य आहे. या प्रभागात संमिश्र प्रकारची लोकसंख्या आहे. योगेश टिळेकर यांच्या मातोश्री व माजी नगरसेविका रंजना टिळेकर यांची उमेदवारी भाजपाकडून निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर भाजपाकडून अनिल येवले, सुनील कामठे, कैलास कामठे, रोहित साळवे, नितीन शेलार, नितीन कामठे, भीमराव साठे इच्छुक आहेत. शिवसेनेतून विद्यमान नगरसेविका संगीता ठोसर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर बधे, गणेश कामठे, मनीषा कामठे, सुरेखा मरळ, रमाकांत शेडगे, रूपाली गायकवाड, किरण ठोसर, स्वप्निल कामठे, रमेश गायकवाड आदी इच्छुकांची जंत्रीच शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका भारती कदम, स्वप्निल शेलार, बाळासाहेब मस्के, अॅड. प्रीती बधे, संदीप बधे, राकेश कामठे, अनिल ढवण, उदयसिंंह मुळीक, सुनील मोहिते, चंद्रकांत हंडाळ इच्छुक आहेत. मनसेकडून विभाग अध्यक्षा सुहासिनी कामठे, अमित जगताप, विलास कामठे, शकुंतला मोरे, सीमा टिळेकर, राजाभाऊ कदम, संजय मोरे, हनुमंत कामठे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून अमोल धर्मावत, दादाश्री कामठे, मीना हुबळीकर, सुशीला निंंबाळकर, मंगला नानगुडे, राकेश जगताप इच्छुक आहेत.त्याचबरोबर कोंढव्यातील बाळासाहेब धांडेकर व कात्रजमधून स्वप्नाली कदम हेही इच्छुक असून, ते कोणत्या पक्षातून लढायचे याची चाचपणी त्यांच्याकडून सुरू आहे.
आमदारांच्या प्रभागात होणार चुरशीची लढत
By admin | Updated: November 14, 2016 06:55 IST