पुणे : पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली असली, तरी पानशेत, खडकवासला, वरसगाव व टेमघर या धरणांच्या क्षेत्रात मात्र अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. या चारही धरणांचा पाणीसाठा २० टीएमसी होत नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहील.पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. पुणे शहराचा पाणीपुरवठा पानशेत, खडकवासला, टेमघर व वरसगाव या चार धरणांवर अवलंबून आहे. या चारही धरणांच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता ३० टीएमसी आहे. या वर्षी पावसाने मोठी दडी मारली व हा साठा एकदम कमी झाला. सर्व धरणे निम्म्यापेक्षा कमी भरली आहेत. त्यांचा सर्व मिळून साठा फक्त १४.६९ टीएमसी आहे. त्यामुळेच पुणे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.दोन दिवसांपासून पुणे शहर व आसपासच्या परिसरात बऱ्यापैकी पाऊस होत आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून रोज, पण फक्त एक वेळ तो होईल, अशी चर्चा शहरात होती.