दौंड : ‘‘राज्यात पुढच्या वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा साखर उद्योग आणखीन अडचणीत येतो की काय असे वाटते,’’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पवार म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत साखरेचे भाव कमी झाले आहेत. परिणामी ऊसउत्पादक सभासदांना एफआरपीप्रमाणे दर देता आला नाही. साखरेचे भाव कमी झाल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसला आहे. ही गंभीर बाब आहे. तेव्हा साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन साखर कारखान्यांच्या संदर्भात सकारात्मक धोरण अवलंबिले पाहिजे, की जेणेकरून साखर कारखानदारी मोडीत निघणार नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’’ पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांबरोबरीने समाजातील इतर अन्य घटक अडचणीत येईल आणि याचा परिणाम आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होण्यात होईल. तेव्हा उपलब्ध आहे ते पाणी जपून वापरावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती नाही
By admin | Updated: July 8, 2015 01:20 IST