पुणे : वाहनाची स्थाननिश्चिती करणारे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस (जीपीआरएस) हे उपकरण पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी भरून नेणाऱ्या टॅँकर्सना बसविण्याची सक्ती केली गेली असली, तरी पुणे महापालिकेकडे या उपकरणांशी संलग्न होणारी यंत्रणा आजपर्यंत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एखाद्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाकडून कशा प्रकारे केली जाते, याचे उदाहरण समोर आले आहे. पिण्याच्या पाण्याचे टॅँकर्स केवळ चारशे रुपयांत भरून नेऊन काही टँकरचालक शहराच्या हद्दीबाहेर नेऊन जास्त पैसे घेऊन विकत असल्याचे व नफेखोरी करीत असल्याचे प्रकार समोर आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी भरून नेणाऱ्या टॅँकर्सना जीपीआरएस बसविण्याची मागणी केली होती. या केंद्रावर रोज अंदाजे दोनशे टॅँकर भरले जात असल्याचे, त्यांची नोंद असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ही संख्या जास्त असल्याचे जाणकार सांगतात. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या आठवड्यात टॅँकर मालकांना जीपीआरएस बसवून न घेतल्यास पाणी न देण्याची कठोर भूमिका घेतली. त्यामुळे टॅँकर मालकांना साडेसहा हजार रुपये खर्चून जीपीआरएस उपकरण बसवून घेणे भाग पडले. हे उपकरण नेटला कनेक्ट होण्यासाठी दर तीन महिन्यांसाठी तीनशे रुपये खर्च करावे लागणार असल्याचे टँकर मालकाने सांगितले.
जीपीआरएसची यंंत्रणाच नाही
By admin | Updated: July 27, 2015 03:38 IST