लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : माथाडींना कामांवर न ठेवण्यासाठी एमआयडीसीमधील काही कंपन्या ठराविक लोकांना पैसे देतात. तर कंपन्यांचे अधिकारी कंपनीतीलच स्क्रॅप, कँटिन आदी कामांचे भागीदारीत ठेके घेतात. हे चुकीचे असून चुकीला माफी नाही, असा इशारा आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
महाळूंगे पोलीस चौकीतील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अधिकारी कक्ष, अंमलदर कक्ष, महिला कक्ष, व्यायाम शाळा आदी कामांचे लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते.
अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ १ उपायुक्त मंचक इप्पर?????? परिमंडळ २ उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण प्रेरणा कट्टे, चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक राजपूत, म्हाळुंगे पोलीस चौकीचे निरीक्षक अरविंद पवार विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले, चाकणला वाढत्या औद्योगिक वसाहत वाढत आहे. तशीच गुन्हेगारीही त्याच पटीत वाढली आहे. माथाडीमुळे जर गुन्हेगारी वाढत असेल तर माथाडी कायदाच नको. मात्र कामगारांना सुरक्षा हवी आहे. कंपन्यांतील विविध प्रकारचे ठेके घेण्यासाठी टोळ्या तयार झाल्या आहेत. याला कंपन्यांच जबाबदार आहेत. अनेक कंपन्यांचे व्यवस्थापकच कामाचे ठेके भागीदारीत करत आहेत. आपल्या टोळीतील माणसांना ठेके देण्याचे ही मंडळी करत असल्यानेच स्थानिक पातळीवर गुन्हेगारी वाढत आहे. पोलीस पाटील तृप्ती मांडेकर, साहेबराव राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले तर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी आभार मानले.
चौकट
एमआयडीसीत गुन्हेगारी वाढली असल्याचे कंपन्यांचे अधिकारी आणि प्रतिनिधी सांगत आहेत. परंतु तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. चाकण आणि म्हाळुंगे अशी दोन पोलीस ठाणे असली तरी अजून एक पोलीस ठाण्याची गरज आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लवकर तो राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
---------------------------
* फोटो - म्हाळुंगे पोलीस चौकीतील विविध कामांचे लोकार्पण बोलताना मान्यवर.