मंचर : सन १९७२ च्या दुष्काळानंतर व १९८८ नंतर प्रथमच मंचर शहरासाठी वडगाव काशिंबेग येथील पद्मावती कुंडावरून पाणी न्यावे लागले आहे. २५ अश्वशक्तीचे दोन पंप लावून हे पाणी सायंकाळी उपसण्यात आल्याने शहराला काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले आहे. पाऊस लांबला तर मंचर शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.मंचर शहराला सुलतानपूर येथून पाणीपुरवठा होतो. पावसाअभावी सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा पडला आहे. सुरुवातीस वडगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने काही दिवस पाणीपुरवठा सुरू ठेवता आला. बंधाऱ्यातील पाणी संपल्याने पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पाणीबाणी निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला अक्षरश: घोड नदीवर तळ ठोकावा लागला.मागील चार दिवसांपासून पाणीच संपले, तेव्हा नदीपात्रातील डोह फोडून पाणी आणण्याचा प्रयत्न झाला. शेवटी वडगाव काशिंबेग येथील पद्मावती कुंडावरून पाणी उपसण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला. यापूर्वी १९७२ व १९८८ या दोन वर्षी मंचर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी या कुंडातून पाणी उपसण्यात आले होते. २८ वर्षांनंतर पुन्हा ही वेळ आलेली आहे.
...तर टंचाईला सामोरे जावे लागेल
By admin | Updated: June 24, 2016 01:58 IST