पौड : पुणे जिल्ह्यामध्ये अनेक सधन तालुके आहेत, जिथे उमेदवारांची कोट्यवधीची संपत्ती पाहून अवाक व्हायला होते. त्या तुलनेतील कमालीचा विरोधाभास म्हणजे मुळशी तालुक्यात उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या उमेदवारांना मात्र संपत्तीची जागा 'नील' म्हणून भरावी लागली आहे. अथवा चरितार्थापुरते जेमतेम उत्पन्न दाखवावे लागले आहे. या वर्षीच्या जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये कासार आंबोली गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने कातकरी बांधवांना राजकीय प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. उमेदवार म्हणून संपत्ती व खर्चाचा तपशील सादर करताना मात्र ़या उमेदवारांसमोर प्रश्नचिन्ह होते. संपत्तीचा रकाना भरताना 'ही काय रे भानगड हाय भाऊ?’ असा प्रश्न या आदिवासी उमेदवाराने उपस्थित केला होता. जिथं स्वत:च्या घराची जागा स्वत:च्या नावावर नाही, स्वत:चं बँक खातंच नाही तिथं संपत्तीचा तपशील काय देणार? त्यामुळे अर्ज भरताना रकाने नील करून या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. राहायला हक्काचं पक्कं घर नाही. रोजच्या खाण्याची भ्रांत. चरितार्थासाठी मजुरीसाठी हात बांधलेले... नदीनाले, डोंगरदऱ्यांत शिकारीसाठी भटकावं. मिळालेल्या मजुरीच्या पैशातून तोंडाला घास मिळवावा... फाटलेल्या छापरातून वर दिसणारं आकाश न्याहाळत झोपी जावं... हे वास्तव जगणं आहे मुळशीतील बहुतांशी कातकरी वस्त्यांचे. परंतु तालुक्याच्या डोंगराळ व दुर्गम भागात जवळपास ५० लहानमोठ्या पाड्यांवर हे कातकरी बांधव वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत. डिजिटल जगाशी मोबाईल आणि डिश टीव्हीमुळे यांतील काही जणांचा संपर्क येत असला, तरी तो केवळ मनोरंजनापुरताच आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणापलीकडे जिल्ह्याच्या आणि त्यापलीकडे देशाच्या राजकारणाशी तर काडीचा संबंध नाही. पण, या वेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत आरक्षणामुळे राजकारण्यांना त्यांना आपलंसं केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. (वार्ताहर)
'त्यांच्या' संपत्तीची जागा मात्र नील!
By admin | Updated: February 17, 2017 04:43 IST