मांडवगण फराटा : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील परभाणेवाडी रस्त्यालगतच्या घरात चोरट्यांनी पती, पत्नी, मुलगी व दोन मुले यांना चाकू व गजाचा धाक दाखवून रोख रक्कम पाच हजार व मंगळसूत्रासह सोन्याचे सहा तोळे दागिने (अंदाजे) लंपास केले. ही घटना मंगळवार, दि.१७ जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत चंद्रकांत धोंडिबा ढवळे यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्रामध्ये फिर्याद दिली. पोलीस हवालदार संतोष कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी केली.चोरट्यांनी घरात घुसून प्रथम घरातील लाईट चालू केला व घरात झोपलेल्या चंद्रकांत ढवळे, पत्नी -उषा चंद्रकांत ढवळे (वय-३८), मुलगी -चैत्राली चंद्रकांत ढवळे (वय-२०), मुलगा ऋषीकेश चंद्रकांत ढवळे (वय-१६) व लहान मुलगा आकाश चंद्रकांत ढवळे (वय-१४) यांना घरामध्येच धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. चंद्रकांत यांनी मारहाण करू नका, तुम्हाला काय घेऊन जायचे ते घेऊन जा, अशी विंनती केली. चोरट्यांनी ओढणी, रुमाल व टी-शर्टने चेहरा बांधलेला होता. त्यांच्यात एक खाकी हापपँट घातलेला शाळकरी मुलगा होता. ते मराठीमध्ये बोलत होते .चोरट्यांनी ४० मिनिटे घरातील सर्व वस्तूंची उचकापाचक केली. कपाटातील रोख पाच हजार, दागिने, अंगावरील दागिने घेऊन ते पसार झाले.पुढील तापास पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल लडकत, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष कुंभार, अमोल गवळी, भूषण कदम हे करीत आहे.
वडगाव रासाईत जबरी चोरी
By admin | Updated: June 19, 2014 05:22 IST