पुणे : मुळा- मुठा नदी सुधार आणि चोवीस तास पाणी पुरवठा योजना या शहराच्या पाणी प्रश्नावर दीर्घकालीन उपयुक्त ठरणाऱ्या योजना आहेत़ चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या सुरू असून, महिनाभरातच जायका कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या कामाची निविदाही काढण्यात येणार आहे़
याबाबत पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले की, नदी सुधार प्रकल्प आणि चोवीस तास पाणी पुरवठा या दोन्ही योजना भाजपच्या महत्वाकांक्षी योजना आहेत. पाणी पुरवठा योजनेतून पाण्याची गळती शोधून पाण्याची बचत होणार आहे. तर नदी सुधार योजनेतून नदीतील पाण्याची शुद्धता वाढणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाण्याची गळती कमी होण्याबरोबरच सुमारे साडेआठ टीएमसी पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार आहे़ याचबरोबर नदी सुधार प्रकल्पामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणार असून प्रक्रिया केलेल्या पाण्याची पुणे परिसरातील एमआयडीसीमधील उद्योगांसाठी विक्री करून पालिकेला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होणार असल्याचेही ते म्हणाले़
नदी सुधार प्रकल्पाचा खर्च बाराशे ते तेराशे कोटी रुपयांपर्यंत होणार असून, आॅपरेशन व मेन्टेनन्सचा खर्च हा वेगळा राहणार आहे़ या प्रकल्पातील एसटीपी प्लांट उभारण्यासाठी ८० टक्के भूसंपादन झाले असून, वारजे आणि बाणेर येथील दोन जागा रोख मोबदला देऊन ताब्यात घेण्याची प्रक्रिया मान्यतेच्या टप्प्यात असल्याचे बिडकर यांनी सांगितले़
-------------------------------------