पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा मालकीच्या जागेत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) असल्यास त्याचे भाडे महावितरणला संबंधित ग्राहकाला द्यावे लागणार आहे. ग्राहकांनी मालकी सिद्ध केल्यास महावितरणला बाजारभावानुसार संबंधित जागेचे भाडे द्यावे लागणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरणच्या कायदे सल्लागाराने दिला आहे. त्यामुळे सोसायट्यांना आता भाडे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाना पेठेतील श्रीराम जयराम सहकारी गृहरचना संस्था मर्र्यादित संस्थेच्या प्रकरणात महावितरणने हा निर्णय दिला आहे. सहकारी संस्थेच्या जागेतील महावितरणच्या रोहित्राला भाडे मिळावे, यासाठी श्रीराम संस्थेच्या वतीने गेल्या दीड वर्षांपासून लढा देण्यात येत होता. त्यांनी महावितरणच्या कायदे विभागाकडे देखील सल्ला मागितला होता. त्यावर सल्लागारांनी संस्थेला बाजारभावानुसार भाडे देता येऊ शकते. मात्र, तसा करार महावितरणबरोबर होणे गरजेचे आहे. हा निर्णय जानेवारी २०१६ रोजी देण्यात आला होता. या निर्णयानंतरही संस्थेला भाडे देण्यात आले नव्हते. आता संस्थेस संबंधित जागेची मालकी सोसायटीकडे हस्तांतरित झाली असल्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितली आहेत. तशी कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित संस्थेशी महावितरणला भाडेकरार करता येईल. असे पत्रच महावितरणच्या रास्ता पेठ कार्यकारी विभागाच्या अभियंत्यांनी श्रीराम संस्थेला दिले आहे.ज्या सहकारी गृहसंस्थेकडे जागेची मालकी असेल व त्यांच्या जागेत रोहित्र असल्यास त्यांना भाडेकरार करता येईल. हा निर्णय केवळ सहकारी संस्थांनाच नव्हे, तर हॉटेल्स, खासगी मालमत्तेच्या जागेत असलेल्या रोहित्रांनाही लागू असेल, असे वेलणकर म्हणाले.
महावितरण होणार सोसायट्यांचे भाडेकरू
By admin | Updated: February 7, 2017 03:19 IST